ऑनलाईन छोट्या जाहिराती लिहताना- ३ : मजकूर

ऑनलाईन छोट्या जाहिराती लिहताना- ३ : मजकूर

Posted
Last updated
ago

या अगोदर आपण पुरेसा मजकूर का महत्वाचा आणि शिर्षक या बद्दल वाचलं. या भागात मजकूर काय लिहावा याबद्दल वाचणार आहोत. हा भाग बराचसा छापील छोट्या जाहिरातींनाही लागू पडतो.

मजकूरात सगळ्यात प्रथम अगदी मूलभूत माहिती आवश्यक आहे. उदा. घर विकणार असाल तर किती खोल्यांचं, किती मजले, आकार लिहा. वाहन विकणार असाल तर किती चाकी, किती माईलेज, कुठल्या वर्षीचं मॉडेल लिहा. जमीन असेल तर किती क्षेत्रफळ, कुठल्या गावाच्या जवळ लिहा. विवाहविषयक असेल तर वय, उंची, शिक्षण इत्यादी गोष्टी आवश्यक. हे अगदी कॉमनसेंस वाटेल पण अनेक जाहिरातीत या मूलभूत गोष्टी नसतात.

मग पहिल्यांदाच जाहिरात देणार असाल तर कुठल्या गोष्टी हव्याच हे कसं कळणार? ते तुम्ही ज्या विभागात जाहिरात देणार तिथल्या इतर जाहिराती पहा. इतर जाहिरातदारांनी काय माहिती लिहलीये ते पहा. पण ती जाहिरात कॉपी करू नका. कारण जाहिरातीच्या क्षेत्रात जितकी तुमची जाहिरात वेगळी तेवढा प्रतिसाद जास्त.
ही माहिती देण्याचा आणखी एक उद्देश म्हणजे तुमचा वेळ वाचेल. जर तुमच्या जाहिरातीला प्रतिसाद म्हणून ग्राहक तेच तेच प्रश्न विचारत असतील तरी ती माहिती तुम्ही सरळ जाहिरातीत लिहू शकता. हा ऑनलाईन जाहिरातींचा एक मोठा फायदा आहे. तुम्ही तुमची जाहिरात हवी तेंव्हा बदलू शकता. छापील जाहिरातीत हा पर्याय नसतो.

जाहिरात लिहण्याचा एक उद्देश फक्त जास्त प्रतिसाद मिळवणे हा नसून नको असलेले प्रतिसाद वगळणे हाही असू शकतो. अगदी साधे उदाहरण म्हणजे " ब्रोकर नको, थेट मालकांनी संपर्क करा" हे वाक्य. किंवा विवाहविषय जाहिरातीत " मंगळ नको किंवा अमूक तमूक व्यवसाय नको".

एकदा मूलभूत गोष्टी लिहून झाल्यावर , तुम्हाला जी सेवा, वस्तू , जमीन यांची जाहिरात करायची त्याबद्दल काही वेगळेपणा असेल तर तो लिहा. उदा जमीन असेल आणि जवळून लवकरच हायवे जाणार असेल, फ्लॅटच्या अगदी चालत जाण्याचा अंतरावर काही सुविधा असतील, शाळा असेल तर ते लिहा. विवाहविषयक जाहिरातीत पुस्तक वाचण्याची आवड आहे हे लिहण्यापेक्षा , कुठले लेखक/लेखिका जास्त आवडतात, कुठल्या व्यक्तिरेखा जास्त भावल्या ते लिहा.

सुरवातीला जाहिरात लिहणे अवघड वाटले तरी वर लिहलेले टप्पे वापरले तर अवघड काही नाही
१. संशोधनः त्याच विभागातल्या इतर जाहिराती पहा
२. मूलभूत आवश्यक गोष्टी लिहा.
३. कुठले प्रतिसाद, काय नको ते लिहा
४. काय वेगळेपणा, विशेष ते लिहा.
५. शिर्षक लिहा.

झाली तुमची जाहिरात तयार.

एकदा लिहून झाल्यावर २-३-४ हाच क्रम ठेवला पाहिजे असे नाही. प्रत्यक्ष जाहिरातीच्या मजकूरात वेगळा क्रम असू शकतो.