महिन्याची जाहिरातः उभ्या उभ्या विनोद फिनिक्समधे गणपती उत्सव २०१२
गेल्या काही महिन्यापासून या विभागात नवीन उपक्रम सुरु केला आहे: महिन्याची जाहिरात.
मायबोलीवर आणि मायबोलीबाहेर (उदा मायबोलीचे फेसबुक पान) या जाहिरातीला विशेष प्राधान्य देऊन दाखवण्यात येईल.
सप्टेंबर २०१२ ची महिन्याची जाहिरात आहे
उभ्या उभ्या विनोद फिनिक्समधे गणपती उत्सव २०१२
जाहिरातदार आहेत विनय देसाई (मायबोली आयडी परदेसाई ). विनय देसाई गेली १० वर्षे मायबोलीकर आहेत.
या जाहिरातीतल्या काही योग्य गोष्टी पाहूया:
१) शीर्षक : उभ्या उभ्या विनोद फिनिक्समधे गणपती उत्सव २०१२
अगदी मोजक्या शब्दात लक्ष वेधून घेणारे शीर्षक आहे.
२) मजकूरः
कार्यक्रम कुठल्या तारखेला आणि किती वाजता आहे याची माहिती आहे. संपर्काची माहीती आहे.
३) ठिकाणः
कार्यक्रमाचा पूर्ण पत्ता दिला आहे. कार्यक्रमांच्या जाहिरातीसाठी हे अत्यंत आवश्यक आहे. भविष्यातल्या काही सुविधांचा लाभ घेण्यासाठीही ठिकाणाबद्दल तपशीलवार माहिती आवश्यक आहे. इतका व्यवस्थित पत्ता सहसा इथल्या जाहिरातींमधे दिसत नाही.
४) सोशल नेटवर्कचा योग्य वापरः
फेसबुक पानाची लिंक आहे. त्याच बरोबर "Like" केल्याने जाहिरातदाराच्या मित्रवर्गातही त्याची माहिती पसरणे सोपे होते. बरेच जाहिरातदार ही सुविधा आहे हे विसरून जातात.
जाहिरातदाराला अजून काय करता आले असते?
१) प्रकाशनाची तारीखः बहुतेक जाहिरातदार एक चूक करतात ते म्हणजे कार्यक्रमाच्या फक्त ३-४ दिवस जाहिरात करतात. त्यामुळे जास्त वाचकांपर्यंत जाहिरात पोहोचण्या अगोदर कार्यक्रम संपून जातो. माझ्या मते इथे नेमकी उलटी चूक झाली आहे. कार्यक्रमाची जाहिरात तब्बल ३ महिने अगोदर केली आहे. कदाचित बाहेरगावावरून येणार्या मंडळीना प्रवासाची तयारी करता यावी म्हणून असेल. पण साधारणतः ३-४ आठवडे अगोदर जाहिरात केली असती तर कदाचित जास्त लक्षात राहिली असती. सध्या ती खूप जुनी झाल्याने बर्याच मागे गेली आहे.
२) मजकूर:
मजकूर नक्की कमी पडतोय. "उभ्या उभ्या विनोद" याबद्दल पहिल्यांदाच वाचणारे असतील त्यांना आकर्षून घेण्यासाठी अजून थोडी माहिती हवी होती. एक सोपी गोष्ट म्हणजे पूर्वी हा कार्यक्रम पाहिलेल्या काही प्रेक्षकांचे अभिप्राय, त्यांच्या नावासकट (परवानगी घेऊन) टाकता येतील. जर तुम्ही अजून हे केले नसेल, तर प्रत्येक कार्यक्रमाला एक "अभिप्राय वही" ठेवून काही अभिप्राय तुम्हाला गोळा करता येतील जे जाहिरातीमधे वापरता येतील.
फिनिक्स मराठी मंडळाची लिंक चालत नाहीये. कार्यक्रम इतका जवळ आला असताना त्यांनी हे तत्काळ चालू करायला हवे.
यातले काही बदल अजूनही सहज करता येण्याजोगे आहेत.
महिन्याची जाहिरात म्हणून निवड झाल्याबद्दल विनय देसाई यांचे अभिनंदन.