ऑनलाईन छोट्या जाहिराती लिहताना- 2 : शीर्षक

ऑनलाईन छोट्या जाहिराती लिहताना- 2 : शीर्षक

Posted
Last updated
ago

एखादी छोटी जाहिरात तुमचे लक्ष का वेधून घेते? शीर्षकामुळे. जेंव्हा छापील जाहिरातींबद्दल लिहले जाते तेंव्हा शीर्षक सगळ्यात महत्वाचे मानले जाते. कारण आधी मोठ्या टायपातल्या शीर्षकाने लक्ष वेधून घेतले तर बाकीची जाहीरात वाचली जाणार.

मग आपल्या लेखमालेची सुरुवात आपण क्रमांक १ : शीर्षक अशी का नाही केली??
कारण ऑनलाईन शीर्षक महत्वाचे असले तरी त्याचे स्थान मजकुरानंतरचे आहे. ऑनलाईन छोट्या जाहिराती दोन प्रकारे पाहिल्या जातात.
१. वाचक त्याला हव्या असणार्‍या शब्दखुणा ( Keywords) सर्च ईंजिनमधे लिहून शोधायचा प्रयत्न करतो. त्यात तुमचे पान वर आले तर तो पटकन त्या पानावर जाऊन वाचणार. आणि वाचायच्या अगोदर पहिले काही शब्द पटकन चाळणार. त्याला हवा असेल तो मजकूर दिसला तर तुमची जाहिरात वाचली जाणार. त्यावेळेस शीर्षक फारसे महत्वाचे ठरत नाही.

मग तुम्ही म्हणाल शीर्षकाकडे कशाला लक्ष द्यायचे? याचे कारण जाहिराती दुसर्‍या प्रकारानेही पाहिल्या जातात.

२. छोट्या जाहिराती या काही वेबपेजेस मधे कडेला किंवा पानावर लक्ष वेधून घेतील अशा ठिकाणी ठेवल्या जातात. ऑनलाईन वाचक पटपट सगळीकडे नजर फिरवत असतो. त्यात तुम्हाला त्याचे लक्ष वेधून घ्यायचे असते. आधी शीर्षकावर क्लिक केले तर बाकीचे वाचणार ना? इथे अगदी छापील माध्यमातले नियम लागू पडतात. त्यामुळे जितके तुमच्या वाचकवर्गासाठी शीर्षक आकर्षून घेणारे असेल तितकी जाहिरात वाचली जाण्याची शक्यता जास्त.

ऑनलाईन आणखी एका कारणासाठी शीर्षक महत्वाचे ठरते. वर १ मधे म्हटल्याप्रमाणे वाचक जरी सर्च ईंजिनवरून तुमच्याकडे आला असेल तरी ते सर्च ईंजिन तुमचे पान कुठे दाखवणार हे थोड्या प्रमाणात तुमच्या पानाच्या शीर्षकावर ( Page Title) अवलंबून असते. त्यामुळे तुम्ही फक्त वर १ मधे म्हटल्याप्रमाणे शोधा मधून येणार्‍या वाचकांवर अवलंबून असला ( Search engine Traffic) तरी शीर्षकाकडे दुर्लक्ष करून चालत नाही. तुमचा वाचक, ज्या शब्द्खुणा वापरून तुम्हाला शोधेल याचा अंदाज तुम्ही बांधू शकत असाल तर, त्यातले काही शब्द शक्य असेल तर जरूर शीर्षकात वापरा.

यापुढच्या भागात वाचा जाहिरातीच्या मजकुराबद्दल.