तुमचे ग्राहक कुठून येत आहेत तुम्हाला माहिती आहे का?
एक मित्र एका नवीन जाहिरात प्रकाराबद्दल सांगत होता. अरे अमुक तमुक प्रकारे जाहिरात केली म्हणजे नक्की ग्राहक मिळतात. मी म्हटलं "कशावरून" . तो बुचकळ्यात पडला. "कशावरून म्हणजे? इतके लोक तिथे जाहिरात करत असतात आणि माझ्या मित्रानेही तशी जाहिरात केली आणि त्यालाही खूप ग्राहक मिळाले. "
मी त्याला म्हटलं " ते सगळं बरोबर आहे आणि तो जगातला सगळ्यात चांगला जाहिरात प्रकार असेल आणि अनेक लोकांना त्याचा फायदाही झाला असेल. पण तुझे ग्राहक , त्या जाहिरात प्रकारामूळे, तू जे विकतो आहेस ते घेणार आहेत का? तुम्हाला आमच्याबद्दल कसं कळालं हा फार महत्वाचा प्रश्न तू ग्राहकांना विचारतोस का? "
त्याने असे कधीच विचारले नव्हते. त्यामुळे कुठला जाहिरात प्रकार त्याच्यासाठी योग्य आहे, कुठल्या जाहिराती उपयोगी पडतात आणि कुठे पैसे वाया जातात याचा त्याला अंदाज नव्हता. कुठलाच जाहिरात प्रकार चांगला किंवा वाईट नसतो. पण तुमच्या धंद्यानुसार, ग्राहकवर्गानुसार काही प्रकारच्या, काही माध्यमातल्या जाहिराती जास्त परिणामकारक ठरू शकतात.
"तुम्हाला आमच्याबद्दल कसं कळालं" प्रश्न अतिशय महत्वाचा आहे आणि प्रत्येक धंदा करणार्या व्यक्तीने तो आपल्या ग्राहकाला विचारायला हवा. इतकंच नाही तर त्याची उत्तरे एका वहीत नीट लिहून ठेवायला हवी. म्हणजे काळानुसार त्या त्या ग्राहकांच्या उगमात काय बदल होतो आहे याच्यावर लक्ष ठेवता येईल. तुमची वेबसाईट असेल तर referral log तुम्हाला आपोआप ही माहिती देतो. पण ज्यांचा प्रत्यक्ष किंवा फोनवर चालणारा व्यवसाय असेल त्यांनाही हे उपयोगी ठरेल.
तुम्हाला कुठल्या जाहिरात प्रकाराचा किंवा माध्यमाचा चांगला अनुभव आहे आणि कुठल्या जाहिरात प्रकाराचा किंवा माध्यमाचा वाईट अनुभव आहे?