ऑनलाईन छोट्या जाहिराती लिहताना-४ : ठिकाण
प्रवासाशी निगडित नसलेल्या, ८०% टक्के छोट्या जाहिराती या स्थानिक वाचकांकडून वाचल्या जातात. उदा. पुण्यातला माणूस घर पाहताना आधी पुण्यातले घर पाहिल. आणि त्यातूनही तर तो कोथरूडमधे राहणारा असेल तर कोथरूड असे लिहलेली जाहिरात त्याचे लक्ष आधी वेधून घेईल. खूपदा जाहिरात लिहणार्या व्यक्तीचा असा मोघम समज असतो (आणि तो चुकिचा असतो) की ठिकाण लिहिले नाही तर ते माहिती करून घेण्यासाठी तरी जास्त प्रतिसाद येईल. पण तसे होत नाही. उलट तुमच्या छोट्या जाहिरातीत ठिकाण जितके जास्त माहितीपूर्ण दिले असेल तितका त्या जाहिरातीचा परिणाम जास्त होतो. प्रत्यक्ष पत्ता देऊ शकत असलात तर आणखी चांगले. कारण जाहिरातदार सोडून स्वतंत्रपणे माहिती पडताळून पाहणे जास्त सोपे होते आणि त्या जाहिरातीची विश्वासार्हता वाढते. आणि जितका जास्त विश्वास तुम्ही तयार करू शकाल तितका तुम्हाला प्रतिसाद जास्त.
हे नियम ऑनलाईन छोट्या जाहिराती असो ( Online Marathi Classifieds) किंवा छापील असो सारखेच लागू पडतील. मायबोलीवरच्या छोट्या जाहिरातींचा फायदा असा की तुम्हाला हे तुम्हाला हे ठिकाण व्यवस्थित आणि तपशिलवार लिहण्यासाठी पुरेशी जागा दिली आहे. आणि त्यासाठी जास्तीचे पैसे पडत नाही. तोच तपशील जर मुद्रित माध्यमात द्यायचा असेल तर जास्त पैसे मोजावे लागतील.
प्रवासाशी निगडित जाहिराती स्थानिक माणसांशिवाय इतरही वाचत असले तरी तपशिलवार ठिकाण लिहले तर तिथेही फायदा होतो. उदा. मी अलिबागला सहलीला जाण्यासाठी राहण्याची जागा शोधत असेन तर ते ठिकाण नक्की कुठे आहे, समुद्रापासून किती जवळ आहे ही माहिती वाचकाच्या दृष्टीने फार महत्वाची असते.
ऑनलाईन जाहिरातींचा आणखी एक फायदा: ठिकाण जर नीट लिहले असेल तर वाचक त्या त्या ठिकाणाप्रमाणे फक्त त्याला हव्या त्याच जाहिराती पाहू शकतो.