आईवडिलांबद्दल पुस्तके लिहिणे – अधिकचा मजकूर
आपण सगळेच जाणतो की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्या आईवडिलांची भूमिका फार फार महत्वाची असते. आयुष्य चालत राहतं,काळ वाहत राहतो आणि एक दिवस आपल्याला आई किंवा वडिलांचा कायमचा वियोग सहन करावा लागतो. शेवटी प्रत्येकाला एक दिवस जायचेच आहे हे माहीत असूनही हे दुःख सहन करण्याच्या पलीकडचे असते.त्यांच्या जाण्याने आपण आत आत कुठेतरी पोकळ होऊन जातो.आपल्याजवळ त्यांच्या लाखो आठवणी असतात.आपल्याला असं वाटतं की हे आठवणींचं भांडार आपल्यानंतरही कायम राहावं.आपली आई कशी होती किंवा वडील कसे होते हे पुढच्या पिढ्यांनाही कळावं.मी स्वतःही यातून गेले आहे,जात आहे.मलाही वाटतं की आपले प्रियजन फक्त फोटोत न राहता त्यांच्यातले गुण,आपल्यासाठी त्यांनी केलेले श्रम,लाखो लाखो आठवणी शब्दबद्ध व्हाव्यात.आपले मत अपेक्षित आहे.मला हे काम प्रामाणिकपणे आणि मनापासून करण्याची इच्छा आहे.अर्थात हे काम व्यावसायिक तत्वावर करणार आहे.कारण हे फुलटाईम काम आहे.आपले मत अपेक्षित आहे.मी जरी हे काम व्यवसाय म्हणून करणार असले तरी दर्जा,रिसर्च अशा कोणत्याही बाबतीत कधीही कमी पडणार नाही.
यात थोडीशी माहिती जोडायला मला आवडेल. अर्थातच प्रत्येकाच्या वागण्याचा,जगण्याचा पाया मानवी भावना हाच असतो. असेही म्हटले जाते की आपल्या वागणुकीचा पाया आपल्या बालपणात दडलेला असतो. आपल्यावर आपल्या मित्रमंडळीचा प्रभाव असतो,शेजारीपाजारी राहणाऱ्यांचा असतो, आसपासच्या समाजाचा असतोच असतो पण मुख्य प्रभाव असतो आपल्या आईवडिलांचा. तेच आपल्या जीवनाचे मुख्य शिल्पकार असतात. माझे स्वतःचे उदाहरण द्यायचे तर माझ्या वडिलांनी माझ्यात वाचनाची सवय अगदी बालपणापासून रुजवली,वाढवली. आजही वाचन हाच माझा दुसरा श्वास आहे, असे मी मानते. शब्द मी जाणीवपूर्वक वापरते आहे पण मी खरोखरी असे मानते की माझ्यात जे काही चांगले गुण आहेत ते माझ्या आईमुळे आहेत, वडिलांनी तर मला वाचनाची सवय लावून मला जन्मभराची अनमोल भेट दिली आहे. माझ्यात जे दोष आहेत ते माझे माझे आहेत असे मी मानते. शेवटी माणूस आपल्या मनाला आणि सद्सद्विवेकबुद्धीला नजरेआड करून नीट जगू शकत नाही. हेच एक कारण आहे की मला हे काम करायचे आहे. पूर्णपणे मनापासून आणि माझे सर्व जीवनकौशल्य वापरून.वाचल्याबद्दल धन्यवाद.